महाराष्ट्र
Trending

पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश ! खेर्डा ते पाचोड या विस्तारित प्रकल्पामुळे 65 गावांना लाभ !!

मुंबई, दि. 18 : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची पुढील टप्प्यातील कामे तत्काळ सुरू करावे, या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, येत्या दीड वर्षात लाभ क्षेत्रातील लाभार्थींना पाणी मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.

मंत्रालयात ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले, ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना पारंपरिक वितरण व्यवस्था ऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा केल्याने होणाऱ्या बचतीतून वाढीव 1750 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी खेर्डा ते पाचोड अशी विस्तारित उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली आहे. यामुळे पाचोड परिसरातील दहा गावांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने नवीन निविदा काढण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पाची कामे सुरू असताना स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाची समस्या निर्माण होऊ नये याकरिता कामे सुरू असतानाच योग्य नियोजन करावे .कायमस्वरूपी पक्के कामे करण्याचे नियोजन करण्यात यावे. कॅनॉल वर पूल बांधताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व गोदावरी खोऱ्यात असून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना आहे.

ही योजना गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात प्रस्तावित आहे. प्रकल्पामुळे सुमारे 65 गावांमधील 20 हजार 265 हेक्टर शेती क्षेत्राला लाभ मिळणार असून 3 हजार 205 हेक्टर वरील निर्मिती होऊन कार्यान्वित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!