महाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरातील हे ५ मुख्य रस्ते वाहतुकीसाठी आज बंद ! मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १६- मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव व मंत्रिमंडळ बैठकीनिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाचा अवलंब नागरिकांनी करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव २०२३ निमित्त दिनांक १६/०९/२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध शासकीय कार्यक्रम आयोजित केले आहे. ज्यात अ) अमित शहा, केंद्रिय गृहमंत्री, भारत यांची सभा चिकलठाणा MIDC परिसरात आयोजित आहे. ब) मराठवाडा मुक्तीसंग्राम दौड,- सुतगिरणी चौक ते क्रांतीचौक, क) लाईट शो- गोपाल टी ते सिल्लेखाना ड) मंत्रिमंडळ बैठक आयोजित असून सदर बैठकीनिमित्त विविध संघटनेचे त्यांच्या मागण्या निमित्त धरणे, अंदोलने व मोर्चे यांचे निवेदने भडकल गेट ते अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने दिले जाणार आहे. त्यामुळे खालील मार्गावर स्पर्धक, मोर्चेकरी व नागरिक व त्यांची वाहने एकाच वेळी एकत्र आल्यास, तेथे मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन, शहरातील नागरिकांच्या सुरक्षितता, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून सदर रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.

दिनांक १६/०९/२०२३ रोजी खालील ठिकाणी व वेळी नमुद मार्ग वाहतूकीसाठी बंद राहतील.
१) सकाळी ०७.०० ते १०.०० वा. – शहानुरमियॉ दर्गा चौक ते सुतगिरणी चौक.
२) सकाळी ०७.०० ते सायंकाळी १७.०० वाजे पावेतो- भडकलगेट ते अण्णाभाऊ साठे चौक.
३) सकाळी ०७.०० ते दिनांक १७/०९/२०२३ रोजीचे ०१.०० वाजे पर्यंत गोपाल टी ते सिल्लेखाना व क्रांतीचौक
उड्डाणपुल पुर्व बाजु आणि क्रांतीचौक उड्डाणपुल पश्चिम बाजुचा सव्हिस रस्ता पुर्णपणे बंद राहिल.

४) सकाळी ०९.०० ते १७.०० वाजे पावेतो क्रांतीचौक, अजबनगर, बंडु वैद्य चौक, सावरकर चौक, निरालाबाजार,
नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी, सांकृतिक मंडळ, ज्युबलीपार्क, भडकल गेट पर्यंत.
५) सायंकाळी १६.०० ते २०.०० वाजे पावेतो वोखार्ड टी ते लहुजी साळवे चौक मार्गे जय भवानी चौक पर्यंत, लहुजी साळवे चौक ते कलाग्राम मार्गे बिकानेर स्वीट पर्यंत (ब्ल्यु वेल सोसायटी सोसायटी चौक) व कलाग्राम ते आयुष पेपर मिल पर्यंत.

या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन-
१) संग्रामनगर उड्डाणपुला जवळुन शंभुनगर, गादिया विहार मार्गे शिवाजीनगर मार्गे पुढे जातील व येतील.
२) शिवाजीनगर, १२ वी योजना मार्गे गोकुळ स्वीट, जय भवानी चौक मार्गे पुढे जातील व येतील.
३) अण्णाभाऊ साठे चौक, टी. व्ही. सेंटर चौक, सेंट्रल नाका, सेव्हनहिल, क्रांतीचौक उड्डाणपुलावरुन, महावीर चौक,
मिल कॉर्नर मार्गे पुढे जातील व येतील.

४) राज्य परिवहन महामंडळ यांच्या बसेस मिलकॉर्नर यु टर्न घेवुन कार्तिकी चौक, महाविर चौक, क्रांतीचौक
उड्डाणपुलावरुन जळगाव टी मार्गे पुढे जातील व येतील.
५) गोपाल टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नर मार्गे पुढे जातील व येतील.
६) गोपाल टी, कोकणवाडी, क्रांतीनगर मार्गे पुढे जातील व येतील.
७) प्रोझोन मॉल, एन-१ चौक, वोखार्ड मार्गे येतील व जातील.

या अधिसुचनाचा भंग करणारी व्यक्ती म.पो.का. कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये अपराधास पात्र राहील. तसेच प्रचलीत मोटार वाहन कायदया प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. सदरची अधिसुचना ही अत्यावश्यक सेवा उदा. पोलीस, रुग्णवाहीका, अग्निशामक वाहन व तत्सम अत्यावश्यक वाहनांना लागु असणार नाही.

पार्किंग व्यवस्था-
मंत्रिमंडळाचे बैठकीसाठी येणारे मोर्चेकरी व निवेदनकर्ते यांच्या वाहनांसाठी कर्णपुरा मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच रिध्दी सिध्दी लॉन्स MIDC चिकलठाणा येथे कार्यक्रमासाठी येणारे नागरिकांची वाहनांसाठी खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
१) गरवारे स्टेडियम शेजारील पार्किंग,
२) नवजीवन मतीमंद मुलांची शाळा कॉर्नर समोरील पार्किंग (जुने रोलेक्स मेटल कंपनी मैदान), ३) जय भवानी चौक, नारेगाव शेजारी मोकळे मैदान

Back to top button
error: Content is protected !!