महाराष्ट्र
Trending

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या त्वरित कार्यान्वित करून नादुरुस्त रोहित्रे बदलण्याचे निर्देश !

- महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचे निर्देश

नांदेड, दि.9 डिसेंबर 2022: महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. त्यानुसार सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या 1 लाख 5 हजार 225 कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या येत्या मार्च 2023 पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये शुक्रवारी (दि.9) आयोजित बैठकीत नांदेड व लातूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, व बीड जिल्ह्यातील कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांचा तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कामांचा संचालक श्री. ताकसांडे यांनी आढावा घेतला.

या बैठकीस नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री सुधाकर जाधव, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता श्री मदन सांगळे परभणीचे श्री शांतीलाल चौधरी, उस्मानाबाद मंडळाचे श्री श्रीकांत पाटील, बीड मंडळाचे प्रभारी  श्री निकम, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता श्री मोहन काळोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण 1 लाख 80 हजार 106 कृषिपंपांना येत्या मार्च 2023 पर्यंत नवीन वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी नोव्हेंबरमध्ये 75 हजार नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

तर उर्वरित 1 लाख 5 हजार 225 वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे नियोजन आहे. नोव्हेंबर महिन्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 20 हजार 250 कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर या महिन्यापासून मार्च 2023 पर्यंत दरमहा 30 हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक पातळीवर कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याची तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही.

प्रत्येक विभागाने दिलेल्या वीजजोडण्यांचे उदिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत अन्यथा दंडात्मक करावाईस्‍ सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही संचालक श्री. ताकसांडे यांनी दिला. कृषी आकस्मिक निधीसह दतर विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

वीज क्षेत्रातील स्पर्धात्मक परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर आपल्याला तातडीने ग्राहकांना सेवा द्यावी लागेल. सर्वत्र शेतीचा रब्बी हंगाम सुरु आहे. विजेचे मागणी वाढली असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहीत्र तात्काळ बदलण्याची कार्यवाही करण्यात यावी

तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र तयार ठेवावेत. मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑईलचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. बैठकीला नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!