महाराष्ट्र
Trending

पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, आडूळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ४५ हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकले !

औरंगाबाद, दि. ७ – स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडुळ येथील सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या बिलाचे चेक काढण्यासाठी ४५ हजारांची लाच घेताना पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, आडूळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अलगद जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज केली.

अशोक सूर्यभान घोडके (वय 36 वर्ष, पद विस्तार अधिकारी पंचायत समिती पैठण तथा प्रशासक ग्रामपंचायत अडुळ तालुका पैठण वर्ग 3 जिल्हा औरंगाबाद), बळीराम दगडू कळंबकर (वय 56 वर्ष पद ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अडुळ, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांच्या वहिनी ग्रामपंचायत आडुळ येथील सरपंच होत्या. त्यावेळी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडुळ येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्याचे काम मिळाले होते. सदर काम तक्रारदार यांनी करून घेतले. सदर कामाचे 2,10,000 रुपयाचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी आरोपींनी दि. ७ डिसेंबर रोजी पंचांसमक्ष लाचेची मागणी केली.  सदरची रक्कम त्यांनी पंचा समक्ष स्वीकारली.

पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक सूर्यभान घोडके यांनी दहा हजारांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार स्वीकारले. तर अडूळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळंबकर यांनी ४० हजार रुपयांची मागणी करून ४० हजार रुपये स्वीकारले.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- पोलीस उप अधिक्षक दिलीप साबळे, सापळा पथक – पोलीस अंमलदार भीमराव जिवडे, विलास चव्हाण, पोलीस नाईक दिगंबर पाठक, चालक पोलीस अंमलदार बागुल यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!