महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, भोकर न्यायालयाचा आदेश

नांदेड, दि. 8 सप्टेंबर: महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साडेदहा वर्षांपूर्वी उमरी तालुक्यातील बोळसा येथे मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्या. वाय एम एच खरादी यांनी एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.

दिनांक 4 फेब्रुवारी 2012 रोजी उमरी तालुक्यातील बोळसा येथे देवीची यात्रा होती त्यानिमित्ताने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ श्री पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते.

याप्रसंगी डीपी मध्ये फ्युज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे त्या ठिकाणी आले आणि तंत्रज्ञ पांडुरंग दत्तराव मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याबाबत पांडूरंग मोरे यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली त्यावरून गुन्हा क्रमांक 6/2012 दाखल झाला होता. पुढे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.

न्यायालयात या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्या. खरादी यांनी राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 353 आणि सह कलम 34 अन्वये एक वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी हजार रुपये रोख दंड तसेच कलम 332 आणि सह कलम 34 नुसार सहा महिने साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दोन्ही शिक्षा त्यांना एकत्रीत भोगावयाच्या आहेत. त्याचबरोबर दंडाची रक्कम पीडित कर्मचारी पांडूरंग मोरे यांना कलम 357 अन्वये अपील कालावधी संपल्यानंतर सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील एस.टी. लाठकर तसेच ॲड रणजित देशमुख यांनी मांडली. याकामी महावितरणचे कनिष्ठ विधी अधिकारी ॲड इम्रान शेख यांचे सहकार्य लाभले.

Back to top button
error: Content is protected !!