महाराष्ट्र
Trending

म्हैसमाळ रस्त्याच्या कामास सुरुवात, खासदार इम्तियाज जलील यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागा झाला !

औरंगाबाद, दि. 14 : खासदार इम्तियाज जलील यांनी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना सुप्रसिध्द पर्यटन स्थळ म्हैसमाळ कडे जाणाऱ्या खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे काम विनाविलंब त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने चारच दिवसांत म्हणजे आज, 14 नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या कामास सुरवात झाली.

खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ आणि म्हैसमाळ ही पर्यटन स्थळे जवळजवळ असल्याने येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. खुलताबाद ते म्हैसमाळ हा रस्ता अतिशय खराब आहे.

म्हैसमाळ येथे भेट देणारे पर्यटक, गिरिजामाता मंदिर व बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात. मात्र हा रस्ता कुठे उंच तर कुठे अधिक खोल होवून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे पर्यटक व भाविक त्रस्त झाल्याच्या अनेक तक्रारी दिल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेत तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यानी दिले होते. त्यानुसार आज रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम थातूर-मातूर न करता मजबूत व पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!