महाराष्ट्र
Trending

वीजेच्या पोलवरील अनधिकृत केबल्स काढण्याची मोहीम, विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश !

व्यवसायिकांनी स्वतःहून केबल्स काढून घ्यावे; प्रशासक

औरंगाबाद, दि.२८ नोव्हेंबर –  शहरातील विविध ठिकाणी विद्युत पोलवर टाकलेली अनधिकृत केबल्स काढण्याच्या मोहिमेची सुरुवात उद्या, २९ नोव्हेंबर पासून हाती घेण्याचे आदेश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी आज दिले.

अनधिकृतपणे  विद्युत पोलवरून टाकलेली केबल्स (ओव्हरहेड केबल्स) काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानिमित्त आज दि 28 नोव्हेंबर रोजी डॉ. चौधरी यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत त्यांनी अनधिकृत केबल्स काढून घेण्याचे नियोजन आजच करून उद्या पासून एक आठवड्यासाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. सदरील काम मोहीम संपल्यानंतर देखील  सुरूच ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मोहिमेच्या वेळेस आवश्यकतेप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले.

ज्या व्यवसायिकांनी अनधिकृत रित्या केबल्स टाकलेले आहेत त्यांनी स्वतः केबल्स काढून घेण्याचे आवाहन यावेळी डॉ चौधरी यांनी केले.

सदरील मोहीम अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग आणि वॉर्ड अधिकारी व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी यांनी संयुक्तपणे राबवावी अशे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

सदरील बैठकीत उप आयुक्त संतोष टेंगळे, राहुल सूर्यवंशी, अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता आर एन संधा,डी के पंडित, उप अभियंता विद्युत मोहिनी गायकवाड, उप अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनोवणे सर्व वार्ड अधिकारी आणि वार्ड अभियंता यांची उपस्थिती होती.

यावेळी कर वसुलीवर विशेष लक्ष देऊन वसुलीची गती वाढविण्याचे निर्देश देखील डॉ चौधरी यांनी यावेळी सर्व उपस्थित वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले.

Back to top button
error: Content is protected !!