महाराष्ट्र
Trending

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचा वर्ध्यात होणार शुभारंभ ! गोदावरीसह 75 नद्यांच्या परिक्रमेचाही शुभारंभ !!

महात्मा गांधी जयंती दिनी 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

मुंबई, दि. 30 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप, ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन याबरोबरच 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांचा आणि नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ कार्यक्रम वर्ध्यातील जिल्हा क्रिडा संकुल येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

त्याच बरोबर “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री नागोराव गाणार, रामदास आंबटकर, अभिजित वंजारी, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच ओळखून महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण 75 नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये “चला जाणूया नदीला” या महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील 75 नद्यांचे संवर्धन करीत असताना राज्यातील नद्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे. तसेच नदी संवर्धन करताना काय करणे आवश्यक आहे, याची दिशा मिळण्यास या महोत्सवाच्या माध्यामातून मदत होणार आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमात लोकसहभाग मिळाला तरच हा महोत्सव यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!