महाराष्ट्र
Trending

वैजापूर: विरगांव हद्यीत लाडगांव पेट्रोल पंप मॅनेजरची बॅग हिसकावून लूटमार करणारी टोळी पुण्यातून जेरबंद !

Story Highlights
  • आरोपी तिलकराज मनमोहनसिंग याने त्याच्या वाटयाला आलेल्या रकमेपैकी १,००,०००/- रुपये बँकेत जमा केल्याचे सांगितल्याने सदरची रक्कम बँकेस पत्र देऊन होल्ड करण्यात आली आहे.

औरंगाबाद, दि. 5- पोलीस ठाणे विरगांव हद्यीत बॅग हिसकावुन लूटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला. ३ सराईत चोरटे जेरबंद करून त्यांचेकडून ३,२९,९६०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी हारुण मुसाखॉ पठाण (वय २४ वर्षे व्यवसाय- मॅनेजर पेट्रोल पंप लाडगांव, रा वांजरगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद) यांनी दिनांक ३१/१०/२०२२ रोजी रोजी पोलीस ठाणे विरगांव येथे फिर्याद दिली की, मी नेहमीप्रमाणे पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक लाडगांव येथे सकाळी ११:०० वा. सुमारास भरणा करण्यासाठी मोटार सायकलवर ब्राउन रंगाच्या सॅकमध्ये घेऊन पेट्रोलपंपावरून निघालो.

सदर सॅकमध्ये ४,०७,३६० /- रुपये रोख रक्कम होती. रोडने जात असताना माझ्या मागून एका मोटार सायकलवर तीन अनोळखी जण हॉर्न वाजवत माझ्याजवळ आले व चालत्या गाडीवरुन माझ्या मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैश्याची सॅक बळजबरीने ओढून त्यांच्या जवळील लाल काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर लाडगांवच्या दिशेन पळून गेले. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोस्टे विरगांव येथे गुरनं २४९/२०२२ कलम ३९२, ३४ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी (१) आकाश संजय गायकवाड (रा. उकलगांव ता. श्रीरामपूर) (२) किरण उर्फ करण नवनाथ गायकवाड (रा. निपाणी वडगांव ता. श्रीरामपूर) (३) तिलकराज मनमोहनसिंग (रा. भोसरी जि.पुणे) यांनी केल्याची व तिलकराज हा त्याच्या भोसरी येथील भाड्याच्या खोलीत लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिलकराज राहत असलेल्या आदर्श नगर, मोशी ता. हवेली जि. पुणे येथील भाडयाच्या खोलीवर छापा मारला असता सदर ठिकाणी तिघे मिळून आल्याने त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नांवे (१) आकाश संजय गायकवाड वय २३ वर्ष रा. उकलगांव ता. श्रीरामपूर (२) किरण उर्फ करण नवनाथ गायकवाड वय २४ वर्ष रा. निपाणी वडगांव ता. श्रीरामपूर ह.मु कापुस वाडगांव ता. वैजापूर (३) तिलकराज मनमोहनसिंग वय २४ वर्ष रा. राजासराई ता. देवसर जि. सिंगरोली राज्य मध्यप्रदेश ह.मु. आदर्श नगर, मोशी, ता हवेली जि. पुणे असे सांगितले.

आरोपींना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा करण्याचा कट रचून त्यासाठी बजाज प्लसर मोटार सायकलची चोरी करुन त्या मोटार सायकलवरून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गुन्हयातील गेलेली रोख रक्कम १,९१,९६०/- रुपये, गुन्हयांत वापरलेली चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल व तीन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,२१,९६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच आरोपी तिलकराज मनमोहनसिंग याने त्याच्या वाटयाला आलेल्या रकमेपैकी १,००,०००/- रुपये बँकेत जमा केल्याचे सांगितल्याने सदरची रक्कम बँकेस पत्र देऊन होल्ड करण्यात आली आहे. आरोपींना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे विरगांव यांच्या ताब्यात देण्यांत आले असून पुढील तपास पोलीस ठाणे विरगांव करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक, मनिष कलवानीया, सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, प्रदीप दूबे, सफौ सय्यद झिया, पोहेकॉ श्रीमंत भालेराव, लहू थोटे, संतोष पाटील, पोना शेख नदीम, वाल्मीक निकम, पोकॉ रामेश्वर धापसे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे राहूल गायकवाड, संजय तांदळे, संतोष डमाळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!