महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण, कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

नांदेड,दि. ०५ नोव्हेंबर : आकोडा टाकून होणाऱ्या वीजचोरीस आळा घालण्याच्या दृष्टीने राबविलेल्या आकोडामुक्त मोहrमेत कंधार तालूक्यातील गोणार येथे तपासणी मोहिमेत अडथळा आणत बालाजी रावसाहेब पवळे या वीजग्राहकाने महावितरणचे कंत्राटी कर्मचारी समाधान इंगळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून वीज गळतीस आळा घालण्याच्या हेतूने नांदेड मंडळांतर्गत आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करत आकडे काढून टाकण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गुरूवारी (दि.३ नोव्हेंबर) महावितरणच्या पेठवडज शाखा कार्यालयाचे कंत्राटी कर्मचारी समाधान इंगळे हे कनिष्ठ अभियंता योगेश अतनुरे आणि कर्मचारी रमेश जाधव, दिलीप आडे, खदीर मोमीन, संतोष डाकोरे,नामदेव टोम्पे, राजनंदनी सोनकांबळे यांचे पथक विज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गोणार येथे गेले होते.

वीज चोरीचे अकोडे काढत असताना गावातील बालाजी रावसाहेब पवळे याच्या मीटरची तपासणी केली असता, पोलवरून मीटर पर्यंत येणारे वायर मीटर जवळ वीजचोरी करण्याच्या उद्देशाने कट केल्याचे दिसून आले. यावेळी बालाजी रावसाहेब पवळे यांने मज्जाव करत माझे मीटर का तपासत आहात केबल का काढतोस असे म्हणत कंत्राटी कर्मचारी श्री समाधान इंगळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल कंधार पोलीस ठाण्यात बालाजी रावसाहेब पवळे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत आहेत. सर्वसामान्य वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा मिळावी याकरिता वीजचोरी विरोधात धडक मोहिम राबवून वीजहानी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा फायदा वीजग्राहकांनाच होणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या मोहिमेस सहकार्य करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन नांदेड ग्रामिण विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.चव्हाण यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!