महाराष्ट्र
Trending

ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीसाठी 10 ऑक्टोबर पासून मंत्र्याच्या बंगल्यासमोर उपोषण !

महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने दिला इशारा, राज्यात ग्रंथपाल 163 तर शारीरिक शिक्षण संचालकांची 139 पदे रिक्त

मुंबई, दि. 30- अकृषि अनुदानित वरीष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदभरती सुरू झाली मात्र महाविद्यालयातील अत्यंत महत्वाचे व एकाकी असेले प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. या पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी यासाठी ८ ऑक्टोबर पर्यंत शासनाकडून पदभरती संदर्भात ठोस अशी पावले उचलली नाहीतर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानासमोर शेकडो पात्रता धारक उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने दिला.

३ नोव्हेंबर २०१८ रोजी युती सरकारने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील विविध पदांच्या भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला. मात्र कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या पदभरतीवर निर्बंध लादण्यात आले. मात्र १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य शासनाने पदभरतीचा शासन निर्णय काढत २०८८ प्राध्यापकांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला. मात्र यात ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील ग्रंथपालांची १६३ व शारीरिक शिक्षण संचालकांची १३९ पदांचा समावेश करण्यात आलेला नाही.

नॅक मुल्यांकन व इतर मुल्यांकन समितीच्या दृष्टीने महाविद्यालयात कायमस्वरूपी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक ही पदे असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे.

सत्ता परिवर्तन होण्याअगोदर जून महिन्यात तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीसंदर्भात हिरवा कंदील दाखवत घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. वेळोवेळी निवेदने व मंत्र्यांच्या भेटी घेऊनही या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष देण्यासाठी तयार नसल्याने शेवटी राज्यातील पात्रता धारक उच्च शिक्षण मंत्री यांच्या शासकीय निवासस्थाना समोरच उपोषण करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

नवीन उच्च शिक्षण मंत्री गांभीर्याने पाहतील का ?
राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथपालांची १६३ तर शारीरिक शिक्षण संचालकांची १३९ एवढीच्या पदांची भरती प्रक्रिया सुरु करायची राहिली आहे. प्राध्यापकांची २०८८ पदे भरण्यासाठी मंजुरी मिळते मग एवढी महत्वाची व अत्यंत कमी पदसंख्या असलेली ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदे भरती करण्यासाठी काय अडचण येत आहे. या गंभीर विषयाकडे नवीन उच्च शिक्षण मंत्री गांभीर्याने पाहतील का, असा सवाल आज राज्यातील पात्रता धारक विचारत आहेत.

शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा पाठिंबा –
महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने पुकारलेल्या उपोषणास महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने जाहीर पाठिंबा दिला असून ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक मिळून या बेमुदत उपोषणासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघटनेकडून आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरु झालेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!