महाराष्ट्र
Trending

पैठणच्या संतपीठाला आळंदीसह विविध ठिकाणच्या अध्यात्मिक संस्था जोडणार ! उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा !!

पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा थाटात, संतपीठाला लवकरच स्वायत्तता देणार

औरंगाबाद, दि.९ : संतपीठाच्या संर्वागिण विकासासाठी आवश्यक असलेल्या २३ कोटी रुपयांच्या निधीसह देशातील सर्वात अधुनिक ’मॉडेल संतपीठ’ ही स्वायत्त संस्था लवकरच पुर्णत्वास येईल. राज्यातील आळंदीसह विविध ठिकाणी कार्यरत अध्यात्मिक संस्था संतपीठाला जोडण्यात येतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि.नऊ) थाटात संपन्न झाला. कुलगुुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची मंचावर उपस्थिती होती.

प्रारंभी पाचही अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या तीन अभ्यासकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांचे मुख्य भाषण झाले. ते म्हणाले, माणसाला भौतिक व तांत्रिक सोयी-सुविधा कितीही मिळाल्या तरी आत्मिक आनंदासाठी अध्यात्म, संत साहित्याचाच आधार लागत असतो.

महाराष्ट्रात आळंदीसह देशात अनेक ठिकाणी संत साहित्य, अध्यात्म या विषयी शिक्षण, संशोधन करणा-यांची संस्था आहेत. या सर्व संख्याचा समन्वय घडवून आणण्याचे काम जे संतपीठाच्या माध्यमातून होईल, संतपीठासह विद्यापीठाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले हे अभ्यासू हे ’प्रो अ‍ॅक्टिव्ह’ आहेत, असे पाटील म्हणाले.

’डीपीडीसी’तून निधी देऊ : संदिपान भूमरे
संतपीठाची मुख्य इमारत अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त असून खुप वर्षांनंतर वापरात आली आहे. या भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहाच्या दुरुस्ती व बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून रक्कम देण्यात येईल, असे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी घोषित केले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी संतपीठाचे अभ्यासक्रम अत्यंत तातडीने सुरु करुन मराठवाडयातील जनतेची मागणी पुर्णत्वास नेली, असेही ते म्हणाले.

दोन विद्यापीठासोबत सामंजस्य करार : कुलगुरु प्रमोद येवले
संताची भूमी म्हणून ओळखलल्या जाणा-या मराठवाडयात संत एकनाथांच्या जन्मभूमीत संतपीठ सुरु झाल्याचा मनस्वी आनंद आहे. संतपीठासाठी २३ कोटींचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावासह संतपीठाला स्वायत्ता देण्याची गरज आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. नांदेड येथील गुरुद्वाराच्या सहकार्याने गुरुग्रंथ साहिब अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. रामटेक येथील कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठ व गुजरात येथील तंत्रज्ञान विद्यापीठासोबत लवकरच होणार असल्याचेही कुलगुरु डॉ.प्रमादे येवले म्हणाले.

पहिल्या दोन्ही बॅचला पाचही अभ्यासक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता संत साहित्यास पदविका व पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. चक्रधर कोठी यांनी सूत्रसंचालन तर रामकृष्ण आकेलकर यांनी आभार मानले.

Back to top button
error: Content is protected !!