महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद परिमंडळातील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश ! शेकडो कनेक्शन तोडल्याने ग्राहकांना शॉक !!

ग्राहकांना वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

Story Highlights
  • औरंगाबाद परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषिपंप, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे ५ हजार ३७७ कोटींचे वीजबिल थकले आहे.

औरंगाबाद : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. औरंगाबाद परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषिपंप, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे ५ हजार ३७७ कोटींचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे महावितरणे म्हटले आहे.

ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

औरंगाबाद शहर मंडलात वीजबिलांची १३८ कोटी ९१ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडलात ३ हजार २०६ कोटी २७ लाख तर जालना मंडलात २ हजार ३२ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने सर्वच यंत्रणा थकबाकी वसुलीसाठी लावली असून, थकबाकीदारांविरोधात यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in  ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध असल्याचे महावितरणने कळवले आहे.

याबरोबरच वीजचोरी करणाऱ्यांविरोधातही महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते सप्टेंबर-२०२२ या सहा महिन्यांत औरंगाबाद परिमंडलात २१३८ ग्राहकांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे. यात १७४ जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!