महाराष्ट्र
Trending

जांबसमर्थ मूर्ती चोरी प्रकरणातील मास्टरमाईंड जेरबंद ! आतापर्यंत चौघे ताब्यात पाचव्याला पकडण्यासाठी पथक रवाना !!

जालना, दि. 29 – जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणात पोलिसांनी आज पुन्हा दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एकाला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी दिली. काल दोघांना अटक करण्यात आली होती. महत्त्वाच्या मोठ्या मूर्ती हस्तगत करण्यात आल्या असल्याचेही शिंदे म्हणाले. बिदर आणि गुलबर्गातून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुख्य आरोपी फरार असल्याने व काही मूर्ती त्याच्याकडे असल्याने पोलिस पथकाने गुलबर्गा (कर्नाटक) राज्यात जावून त्याचा शोध घेतला. जिलानी सय्यद पाशा शेख (45 वर्षे रा. पडसाळगी ता. आळंद जि. गुलबर्गा) येथून ताब्यात घेतले. विचारपुस केली असता त्याने आरोपी पाशामियाँ मशाकसाब शेख (32, रा. माशीमढु, भालकी जि. बिदर, कर्नाटक) यास मूर्ती विक्री केल्याचे सांगितले. पाशामियाँ मशाकसाब शेख वय यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता माता, हनुमान, श्रीकृष्ण व इतर देवतांच्या मूर्ती हस्तगत केल्या. या मूर्तीची किंमत 87100 रुपये असल्याचे सांगण्यात आले..

गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या जांबसमर्थ येथील देवी-देवतांच्या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी काल लावला. महाराष्ट्रातील बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा जिल्हा पिंजून काढत पोलिसांनी सोलापूर आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरून दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून भगवान श्रीराम, सीतामाता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकूण 05 मूर्ती कालच हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी दिली.

शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य, ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (ओतारी) (रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) अशी यापूर्वी म्हणजे काल अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनांक 22/08/2022 रोजी तक्रारदार धनंजय वसंतराव देशपांडे (रा. जांबसमर्थ ता. घनसावंगी जि. जालना) यांनी पोलीस ठाणे घनसावंगी येथे येवून तक्रार दिली की, जांबसमर्थ येथील राममंदिर येथे ते पुजारी व व्यवस्थापक म्हणून काम करतात. दिनांक 21/08/2022 रोजी रात्री 21.00 ते दिनांक 22/08/2022 रोजी 06.00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी राम मंदिरामध्ये प्रवेश करून गाभाऱ्यातील भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता व हनुमान तसेच इतर देवतांच्या मूर्ती चोरून नेल्या आहेत. या आशयाच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे घनसावंगी येथे गुन्हा दाखल असून गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्याकडे देण्यात आला.

गुन्हयाचे घटनास्थळास पोलीस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा उघडकीस आणण्या करीता पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिल्या. त्यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांचे वेगवेगळे तपास पथके तयार करण्यात आले होते.

सर्व तपास पथके हे गुन्हयाचा गुप्त बामतीदारा मार्फत, तात्रीक विश्लेषनाद्वारे रेकॉर्ड वरील आरोपीतांना चेक करून तसेच सर्व प्रकारे बारकाईने तपास करीत होते. तपासा दरम्यान पथकातील अधिकारी अंमलदार हे संपूर्ण महाराष्ट्रातील बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा तसेच कर्नाटक राज्यामध्ये जावून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान दिनांक 25/10/2022 ते दिनांक 28/10/2022 पर्यंत तीन दिवस पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग व स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील सर्व अधिकारी अमंलदार तपासकामी उस्मानाबाद, सोलापूर, लातूर व कर्नाटक राज्यामध्ये जावून गुन्हयातील आरोपी व चोरीचा शोध घेत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरून गुन्हयातील आरोपी शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य, ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद) यास सोलापूर जिल्हयातून ताब्यात घेतले. विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या एका साथीदारासह केल्याचे सांगून चोरी केलेल्या मूर्ती महादेव शिवराम चौधरी (ओतारी) रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर याचेकडे ठेवल्याचे सांगितले.

त्यावरुन त्याच्या साथीदाराचा उस्मानाबाद, सोलापूर लातूर, कर्नाटक राज्यामध्ये तपास पथका मार्फत शोध घेत आहोत. महादेव शिवराम चौधरी (ओतारी) रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर यास ताब्यात घेवून श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकूण 05 मूर्ती हस्तगत करण्यात आलेल्या आहेत व उर्वरीत मूर्ती या फरार आरोपी घेवून गेल्याचे सांगितले.

दरम्यान, आज पोलिसांनी या प्रकरणातील अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य एकाला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शिंदे यांनी दिली. लवकरच त्याला ताब्यात घेऊ व उर्वरित मूर्ती हस्तगत करू असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य, ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (ओतारी) (रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर), जिलानी सय्यद पाशा शेख (45 वर्षे रा. पडसाळगी ता. आळंद जि. गुलबर्गा) व पाशामियाँ मशाकसाब शेख (32, रा. माशीमढु, भालकी जि. बिदर, कर्नाटक) अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Back to top button
error: Content is protected !!