महाराष्ट्र
Trending

वीजचोरी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश ! ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देवून अचूक रीडिंग घ्या: सिएमडी विजय सिंघल

 नागपूर, दि. २६ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या वीज ग्राहकांना ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल व ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच असून संबंधित अधिकाऱ्यांनी यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी, असे निर्देश  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नागपूर प्रादेशिक विभागातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

ऊर्जाक्षेत्रात पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. आता वीज खरेदीचे पैसे नियमित द्यावेच लागतात. ते न दिल्यास महावितरणला मिळणाऱ्या विजेत कपात केली जाऊ शकते. त्यामुळे महावितरणला वीज निर्मिती कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे तातडीने व नियमित  देणे गरजेचे असते.

महावितरणला मिळणाऱ्या कर्जावरही मर्यादा आली आहे. ही सर्व वस्तुस्थिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या वस्तुस्थितीची जाणीव ग्राहकांनाही करून देणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांशी सातत्याने संवाद साधा असे निर्देश विजय सिंघल यांनी बैठकीत दिले.

ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याची सवय लावण्याची गरज आहे. ग्राहक मोबाईल, केबल टीव्ही सारख्या इतर कंपन्यांचे बिल भरणे टाळत  नाही. महावितरणचे वीज बिल भरणे मात्र टाळतात. अशा ग्राहकांकडे महावितरणच्या वीज बिलाची अजिबात थकबाकी राहणार नाही यासाठी नियमितपणे वसुली मोहीम राबवा, वीजचोरी विरुद्ध कठोरपणे कारवाई करा असेही निर्देश त्यांनी या आढावा बैठकीत दिले.

या बैठकीमध्ये नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंते सर्वश्री सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर),अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता  उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!