महाराष्ट्र
Trending

समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंतवणुकीत वाढ होणार ! ट्रक टर्मिनल प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश !!

· उद्योजकांनी स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य द्यावे- उद्योगमंत्री उदय सामंत

Story Highlights
  • ऑरिक सिटीपासून केवळ 900 मीटरवरून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला ऑरिक सिटी जोडल्यास नक्कीच फायदा होणार आहे.

औरंगाबाद, दि 21 (जिमाका) : ऑरिक सिटीमध्ये अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत. ऑरिक सिटीच्या जवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

ऑरिक सिटीला उद्योगमंत्र्यांनी आज भेट देऊन येथील उद्योजक तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. बैठकीपूर्वी जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या महा एक्स्पो बाबत मसिआच्या पदाधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करुन नियोजनाची माहिती घेतली.

यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, ऑरिकचे सह संचालक श्री काकुस्ते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

उद्योगमंत्री म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू आहेत आणि अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ऑरिक सिटीपासून केवळ 900 मीटरवरून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला ऑरिक सिटी जोडल्यास नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याशी कनेक्टीव्हीटी वाढून वेळेची बचत होणार असल्याने उद्योजक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील.

उद्योग वाढीसाठी काही नवीन योजना सुरू करता येतील का याचाही विचार करण्यात येत आहे. ऑरिक सिटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करावे, ट्रक टर्मिनल उभारावे, रहिवाशी वसाहतींमधील समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले.

यावेळी पैठण, वैजापूर तसेच करमाड परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उद्योगमंत्री म्हणाले, उद्योजक आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवावा, इतर काही समस्या असल्यास तसा प्रस्ताव पाठवावा त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीतनंतर मुंबईत बैठक घेणार असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण एमआयडीसीतील समस्या उद्योगमंत्र्यांना सांगितल्या. गेवराई तांडा ते वाळुज रस्ता बनविल्यास या क्षेत्रातील उद्योगांना भरारी मिळणार असल्याने यावर तातडीने करावी, उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरी द्यावी तसेच सीएसआर हा जिल्ह्यातील विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उद्योजकांना सूचित करण्याची विनंती देखील उद्योगमंत्र्यांना केली.

Back to top button
error: Content is protected !!