महाराष्ट्र

ग्रामसेवकांनी फुलवले गाव अन् वाढवले पाणी ! अंगणवाडी सेविका, आशा वर्करचाही मोलाचा सहभाग !!

जिल्हा परिषदेच्या ‘बेस्ट प्रॅक्टीसेस’ अभियानात प्रेरणादायी यशकथा

 नागपूर, दि. 24 – ग्रामपंचायत सचिव अर्थात ग्रामसेवक ग्रामीण भागात गावांच्या विकासातला महत्त्वाचा घटक. वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहणारा मात्र या कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर गावांचा कसा कायापालट होऊ शकतो याच्या यश कथा नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस प्रेझेंटेशन’ या कार्यक्रमातून पुढे आल्या आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेस्कर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या कारभारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यश कथांचे जाहीर प्रदर्शन व त्याचे इतरांसाठी लाईव्ह प्रक्षेपण ‘बेस्ट प्रॅक्टिसेस प्रेझेंटेशन’ या कार्यक्रमातून केले जाते.

आपल्याच अवतीभवती असणारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, अभियंते, पशुसंवर्धन अधिकारी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, यांनी आपापल्या गावात केलेल्या दर्जेदार प्रयोगाला थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांपुढे सादर करण्याची संधी जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात दिली जाते. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाते. जेणेकरून या प्रयोगाचा अन्य लोकांनाही लाभ होईल व त्यातून ते प्रेरणा घेतील.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या कार्यक्रमात यावेळी ग्रामसेवकांनी काही गावांमध्ये आपल्या अभिनव प्रयोगाने, सचोटीने व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सकारात्मक पाठबळामुळे छोट्या छोट्या प्रयोगातून गावाला वेगळे स्वरूप दिले आहे. यामध्ये ‘येणीकोणी, खापरी (केणे ), मंगरूळ,रायपुर, खुर्सापार, फेटरी, वेळाहरी, कढोली येथील ग्रामसेवकांनी त्यांच्या गावात केलेल्या काही प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. आज तृप्ती रेवतकर, जोश्ना पेठे, जया पाटील, कमलकिशोर डाखोळे, राजू कोल्हे, नरेश मट्टामी, सचिन खोडे, ब्रह्मानंद खडसे, मंजुषा दळवी आदी ग्रामसेवकांनी आपले सादरीकरण केले.

खुर्सापार,येणीकोणी, खापरी (केणे )या गावांमध्ये महिला ग्रामसेवकांनी जलसंधारण क्षेत्रामध्ये केलेले प्रयोग अभिनव आहेत. आजूबाजुच्या परिसरातून वाहत जाणारे नाले, ओढे यावर एकाच गावांमध्ये दहा दहा बंधारे बांधण्याचे काम या ग्रामसेवकांनी केले आहेत. नदी खोलीकरण, पाण्याचे वर्गीकरण, गावातील नागरिकांना पाणी वापरण्याची असणारी गरज ,शोषखड्डे, कचरा विलगीकरण, वृक्ष लागवडीतून ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करणे, गावातील पाणी पातळी वाढविणे, गावामध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करणे, अशा नजरेत भरणाऱ्या अनेक प्रयोगांना या महिला ग्रामसेवकांनी करून दाखविले आहे. एखाद्या ग्रामसेवकाने मनात घेतले तर दुष्काळी गावात सुद्धा पाण्याची टंचाई संपवू शकते, याचे हे उदाहरण आहे.

याशिवाय स्वच्छ गाव सुंदर गाव, जलयुक्त गाव, जलसमृद्ध गाव, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हरित व स्वच्छ गाव, या संदर्भातही सादरीकरण झाले. जिल्हा परिषदेच्या मार्फत youtube वर ‘बेस्ट प्रॅक्टिसेस प्रेझेंटेशन ‘ या सदरात हे सर्व व्हिडिओ उपलब्ध असून ग्रामसुधारणांमध्ये रस असणाऱ्या सर्वांनीच या व्हिडिओचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, प्रकल्प संचालक विवेक इलमे, गटविकास अधिकारी डॉ. स्वप्नील मेश्राम व विविध गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!