वीजचोरी पडली महागात, एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली
गडहिंग्लज न्यायालयाचा निकाल
औरंगाबाद, दि.१३ सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४० वर्ष) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकांने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे २ लक्ष ५० हजार रुपयांची वीजचोरी केली होती.
१९ नोव्हेंबर २०१५ रोजी ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील वीजग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांच्या सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले.
ॲक्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीजमीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकाऱ्यांनी वीजमीटर सील केले. सदर वीजमीटरची गडहिंग्लज येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी वीजभार तपासणी करून पंचनामा करण्यात आला.
या वीजभार तपासणीत वीजमीटर ७५.९४ टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकाऱ्यांनी वीजमीटर सील केले. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर येथील वीजतपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीजमीटर तपासले. या तपासणीत वीजमीटरमध्ये वीजवापर कमी नोंदवला जावा, अशा पद्धतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.
ग्राहकाने सदरील वीजचोरीच्या २२ फेब्रुवारी २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५ या निर्धारित १९ महिने कालावधीत २४ हजार ६७५ युनिटची वीजचोरी केली. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मूल्यानुसार २ लाख ५० हजार रुपये व तडजोडीचे रक्कम १ लाख ५० हजार रुपये इतके बिल देण्यात आले होते.
मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३८ अन्वये भाऊराव संभाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व १० हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.
सदरील प्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) निवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बोकील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील तेली यांनी कामकाज पाहिले.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट