महाराष्ट्र
Trending

शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने : शिवाजी पार्कवील दसरा मेळाव्यावरून राजकारण तापले !

मुंबई, १९ सप्टेंबर – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सोमवारी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला येथील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे मेळावा घेण्यास मंजूरी मिळाल्यानंतर आता शिवसेनेची सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितले की, बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर शिंदे गटाला रॅली काढण्याची परवानगी देताना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ हे तत्त्व लागू करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर एमएमआरडीएचे मैदान आहे.

प्रतिद्वंद्वी शिवसेनेच्या गटांनी प्रतिष्ठित शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित केल्याचा दावा केला आहे. पुढील महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर तेथे मेळावा घेण्यास दोन्ही बाजूंनी परवानगी मागितली आहे. बीकेसी येथील रॅलीसाठी शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे, मात्र शिवाजी पार्क मैदानाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सावंत यांनी सांगितले की,”आता आमच्यासाठी (शिवाजी पार्कवर रॅलीला परवानगी) सोपे होईल. त्यांना (शिंदे गटाला) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे. हेच तत्व शिवाजी पार्कच्या बाबतीतही लागू व्हायला हवे.

शिवसेना स्थापन झाल्यापासून दरवर्षी पक्षाकडून शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा आयोजित केला जातो. यंदाचा मेळावा हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोघांसाठीही प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे कारण या दोघांनीही शिवसेनेवर दावेदारी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!