महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबादेतील 244 केंद्रांवर 32 भरारी पथकांची करडी नजर ! पदवी परीक्षांना सुरुवात, मतदानाच्या काळात सुट्टी !!

तीन लाख १२ हजार २०९ परीक्षार्थी

Story Highlights
  • सर्वांधिक एक लाख ४८ हजार ९१७ विद्यार्थी कला व सामाजिकशास्त्र शाखेतून परीक्षा देणार आहेत.

औरंगाबाद, दि.२२: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (परीक्षा प्रथम वर्ष वगळून) परीक्षा मंगळवारपासून सुरु झाल्या आहेत. तीन लाख १२ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरु आहे. यामध्ये बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरु झाली. तर प्रथम वर्ष व अन्य व्यावसायिक पदवी, अभ्यासक्रम, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबर मध्ये होणार आहे.

पदवी अभ्यासक्रमासाठी चार जिल्हयात २४४ परीक्षा केंद्र आहेत. यामध्ये सर्वांधिक एक लाख ४८ हजार ९१७ विद्यार्थी कला व सामाजिकशास्त्र शाखेतून परीक्षा देणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून ४३ हजार ३६९ व विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतून एक लाख १९ हजार ९२३ असे एकूण तीन लाख १२ हजार २०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

या सत्र परीक्षांना अधिसभा निवडणुक मतदानाच्या काळात २५ व २६ नोव्हेंबर तसेच ९ व १० डिसेंबर रोजी सुट्टी देण्यात आली. पदवी परीक्षेसाठी विद्यापीठाने सत्र परिक्षेसाठी चार जिल्ह्यात २४४ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्हयात ९९ केंद्रे आहेत. बीड ६२, जालना ५३ तर उस्मानाबाद जिल्हयात ३० परीक्षा केंद्रांवरून परीक्षा होणार आहे.

यातील ४३ परीक्षा केंद्रे शहराच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात २०१ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्हयात ११ पथके कार्यरत आहेत. बीडमध्ये दहा, जालना सहा आणि उस्मानाबादमध्ये पाच भरारी पथकांचा समावेश आहे.

शांतपणे परीक्षा द्या – कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
चार जिल्हयातील २४४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा मंगळवारी सुरळीतपणे सुरु झाली. सकाळी १० ते १ तर दुपारी २ ते ५ दरम्यान पेपर होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात व शांतपणे पेपर द्यावेत, असे आवाहन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!