महाराष्ट्र
Trending

पदवीधर निवडणुकीसाठी औरंगाबाद शहरात आठ केंद्र ! जिल्ह्यातील सर्वाधिक 17 हजार मतदार ठरणार निर्णायक !!

औरंगाबाद, दि.२३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद शहरात आठ मतदान केंद्रावर २९ बूथ असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

पदवीधर अधिसभा गटातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होत असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी सहा मतपत्रिका असणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी पांढ-या रंगाची मतपत्रिका असून ५ जागांसाठी २९ उमेदवार आहेत.

तर राखील गटातून प्रत्येकी एक जागा असून पत्रिकेचा रंग व उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती (फिकट निळा-७), अनुसूचित जमाती (पिस्ता-४), भटके विमुक्त जाती-जमाती (फिकट हिरवा-५) इतर मागास वर्ग (फिकट पिवळा -४) तर महिला गटासाठी (फिकट गुलाबी-४) रंगाची मतपत्रिका असून ४ उमेदवार आहेत.

पदवीधर गटातून मतदानासाठी चार जिल्ह्यांतून सर्वाधिक १७ हजार ७६५ मतदारांनी नोंदणी औरंगाबाद जिल्हयात केली असून १६ मतदान केंद्र असणार आहेत. तर बीड जिल्हयात १२ हजार ५९३ असून १६ केंद्रावर, जालना जिल्हयात ३ हजार ९९३ असून ९ केंद्रावर तर उस्मानाबाद जिल्हयात २ हाजर ५३१ मतदार असून १० केंद्रावर मतदान होईल.

या निवडणुकीत एकूण मतदार ३६ हजार ८८२ मतदार आहे. औरंगाबाद शहरात ८ केंद्रावर २९ बुथ असणार आहेत. यामध्ये देवगिरी महाविद्याल (६ बूथ), नाटयशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (सहा), मौलाना आझाद महाविद्यालय (सहा), विवेकानंद महाविद्यालय (चार), वसंतराव नाईक महाविद्यालय (चार), छत्रपती शिवाजी महाविद्यालय (दोन), सरस्वतीभूवन (एक) तर मिलिंद महाविद्यालय (१ बूथ) असणार आहे.

प्रत्येक बूथला मतदान केंद्र प्रमुखासह चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. गुरुवारी सर्व कर्मचा-यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात येईल. तर शुक्रवारी सर्व केंद्रासाठी मतपत्रिका पेटी मतपेटीसह सर्व साहित्य पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.भगवान साखळे यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब, अमोल शेळके, कपिल साळवे, आनंद साळवे, दत्ता गवळी, पंकज बेडसे, रिहान सय्यद, राहुल जावळे, रिजवान शेख, प्रदीप चौधरी, शकील रामपुरे आदी परिश्रम घेत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!