महाराष्ट्र
Trending

जो जात मानतो त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे अवघड ! राष्ट्रतेज, एकात्मतेची मुल्ये डॉ.आंबेडकरांनी रुजवली: ज्येष्ठ समीक्षक डॉ.ऋषीकेश कांबळे

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६६ वा महापरिनिर्वाण दिन

औरंगाबाद, दि.६ : जगातील बृहतांशी देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता व बंधूता ही तीन मुल्ये आहेत. तथापि भारतीय राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ’सामाजिक न्याय’ हे चौथे  मुल्ये समाविष्ट केले. तसेच राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता व अखंडता ही मुल्येही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजविली, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ समीक्षक डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाटयगृहात मंगळवारी (दि.६) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला. यावेळी सरस्वती भूवन महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.ऋषीकेश कांबळे यांचे ’राष्ट्र निर्मीते डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ ऋषिकेश कांबळे म्हणाले, जो पहिल्यांदा जात मानत नाही तो आंबेडकरवादी असतो, जो जात मानतो त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे अवघड आहे, आज सर्वांगाने डॉ बाबासाहेब समजून घेणे गरजेचे आहे. पूर्वी शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक अभ्यासले, त्या काळातील शिक्षकानी शिकविले, की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते. तथापि पुढे बाबासाहेबांचा विविध अंगांनी अभ्यास झाला आणि कळले की ते केवळ दलितांचेच नव्हे तर समस्त बहुजनांचे, देशाचे ते नेते आहेत.

छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली माणगांव येथे बहिष्कृतची परिषद भरली होती त्या परिषदेत महाराजांनी भाकीत केले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे, बहुजनांचे नेते होतील. ते पुढे खरे ठरले. बाबासाहेबांनी मानव मुक्तीच्या चळवळीला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सोबत स्वजातीपेक्षाही अन्य समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओबीसी, एसबीसी हे शब्दप्रयोग पहिल्यांदा बाबासाहेबांनीच वापरात आणले. गौतम बुद्धानंतर असंख्य लाटा आल्या, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामाजिक परिवर्तन घडवून आणले, हीच मोठी लाट ठरली. त्याकाळी आपला भूगोल फक्त दोघांना नीटपणे माहित होता, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आणि महात्मा गांधी. त्यांना सर्व अखंड भारतातील सर्व जाती धर्म माहित,जे ७ धर्म,२५ पंथ ८ हजार जाती, १६ भाषा आहेत.

इतर अनेक भाषा आहेत , ज्या डॉ बाबासाहेबाना माहित होत्या .  बाबासाहेबांचे अजून काही संकल्प अपुरे आहेत, महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या वाती पेटविल्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. भारतीयांनी धर्माचा, जातीचा, भाषेचा अहंकार न बाळगता राष्ट्रप्रेम जतन करावे. बाबा साहेबांनी सांगितलेल्या वाटेने जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, असेही डॉ.कांबळे म्हणाले. सुमारे सव्वातासाच्या व्याख्यानात डॉ.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान सोदाहरण विषद केले.

 ’एन्ट्रन्स इन पॉलिक्टस’ स्वतंत्र विभाग करणार : कुलगुरु
राजकीय व्यवस्थेत देखील शिक्षीत व अभ्यासू लोक आले पाहिजेत, या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ’स्कूल ऑफ एंट्रन्स इन पॉलिटिक्स’ या संस्थेची संकल्पना विद्यापीठाने प्रत्यक्ष आणली आहे. सध्या कोर्स सुरु केला असून आगामी काळात पदव्यूत्तर पदवी व स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घोषित केले.

डॉ.संजय सांभाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.आनंद देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, रासेयो संचालक डॉ.आंनद देशमुख, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.संजय सांभाळकर, डॉ.सतीश दांडगे डॉ.विलास इप्पर, डॉ.प्रशांत पगारे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी सहभागी होते.

Back to top button
error: Content is protected !!