महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी ! अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ !!

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार -मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

Story Highlights
  • भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांच निसर्गाशी अतूट नातं आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू

मुंबई, दि. 20 :- राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2022 अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आणि कुलाबा येथील शाळेतील तसेच कमला मेहता अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, “कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे असलेले निर्बंध संपून आता सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण देखील उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे”. मागील काही वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी ध्वनी आणि हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचतो त्‍यामुळे दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्षभर जनजागृती करण्यात येत असल्याची पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सिद्धी निकम या दिव्यांग विद्यार्थींनीने आपण वसुंधरेचे रक्षक बनून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करूयात, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित सर्वांना केले. शासनाने एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी आणावी तर, दैनंदिन वापरात नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, अशी विनंतीही तिने केली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण रक्षणाची शपथ – ‘भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांच निसर्गाशी अतूट नातं आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.

आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की, दैनंदिन जीवनात ज्या सिंगल युज प्लास्टिकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू.

आम्ही असाही संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लाऊ व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.

दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश, या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरीता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.

आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!