महाराष्ट्र
Trending

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक: सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी !

साठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज

Story Highlights
  • मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे;

मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘166 अंधेरी पूर्व’ या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून रविवार, दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे दि‌. 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर रविवार दिनांक दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

या मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.

या मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून 15 व्यक्तींना नेमता येते. ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत.

रविवार, दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 8.30 वाज़ता ‘ईव्हीएम’ यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, ‘ईव्हीएम’ आधारित मतमोजणीसाठी 14 मेज असणार आहेत.‌

मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘एलसीडी स्क्रीन’ वर देखील दाखविण्यात येणार आहे; अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी यानिमित्ताने दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!