महाराष्ट्र
Trending

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून राज्यपालांनी आता पार मर्यादा ओलांडल्या: शरद पवार

वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक; समाजात गैरसमज वाढेल कसा हेच मिशन - शरद पवार

Story Highlights
  • बेळगाव, कारवार, निपाणीसह गावे ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते...
  • ज्योतिषीवर माझा विश्वास नाही त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही...
  • गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती...

मुंबई दि. २४ नोव्हेंबर – राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी शंका व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेला उल्लेख या सगळ्या गोष्टी असे सांगतात या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते त्याचे यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रात पाठवलेली आहे असेही शरद पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल म्हणाले.

राज्यपाल ही एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून त्यावर आतापर्यंत कोण बोलले नाही मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपालांनी आता पार मर्यादा ओलांडल्या आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर काल त्यांचे कौतुक करणारे स्टेटमेंट आले आहे पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी त्यांचा निकाल घेतला पाहिजे आणि अशाप्रकारच्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे योग्य नाही असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे परंतु आम्ही बरीच वर्षे बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर गावे मागत आहोत. त्यामध्ये आमचे सातत्य आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते मात्र काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही अशा शब्दात शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकणार  नाही कारण अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.

हल्ली महाराष्ट्रात नवीन काही सुरू झाले आहे जे कधी महाराष्ट्रात नव्हते. आसाममध्ये काय घडले हे सगळे देशाला माहित आहे आता पुन्हा आसामची टूर होणार आहे तसे वर्तमानपत्रात वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणे आणि आणखी कुठे सिन्नरला जाणे व कुणालातरी हात दाखवणे या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य हा राज्याचा लौकिक आहे त्या राज्यात या सगळ्या गोष्टी नवीन पहायला मिळत आहे. मात्र नवीन पिढी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत नाही हे दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्रीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

दुसर्‍या राज्यात निवडणूका म्हणून आपल्या राज्यात सुट्टया देण्याचा प्रघात यापूर्वी ५०-५५ वर्षात ऐकला नाही. गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती आहे असेही शरद पवार म्हणाले.

काल सुप्रीम कोर्टाने जी प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय स्वच्छ भूमिका आहे हे सांगते. या सगळ्या नियुक्त्यांमध्ये कोर्टालाही सांगण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच सत्तेचा दुरुपयोग कशापद्धतीने केला जात आहे हे त्यांच्याही लक्षात आले आहे असेही शरद पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

राज्यात आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे. इतक्या संकटात पहिल्यांदाच सापडला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची राज्यसरकारची जबाबदारी आहे मात्र तशी ठोस पावले उचलताना सरकार दिसत नाही. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने बघायची गरज असताना सरकार बघत नाही ही दु:खद बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!