महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

समृद्धी महामार्गाची छोटी-छोटी प्रलंबित असलेली कामे पूर्ण होताच उद्घाटनासाठी प्रधानमंत्री मोदींना बोलवणार – फडणवीस

नागपूर, दि. 7 – समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. काही छोटी-छोटी कामे प्रलंबित असल्याने आम्ही अजून तारखेवर आग्रह केलेला नाही. ती होताच प्रधानमंत्र्यांची तारीख घेऊन उद्घाटन करण्यात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर येथे फडणवीस बोलत होते. दरम्यान,  नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर येथे झाली. या बैठकीला प्रवीण दटके, समीर मेघे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, आशीष जयस्वाल, सुनील केदार, अभिजित वंजारी आणि इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्याच्या नियोजन आराखड्यावर विस्तृत चर्चा झाली.

जुन्या खर्चाचा आढावा आणि यावर्षीचा निधी याचा सर्वंकष आढावा घेतला. शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्यापेक्षा वेळेत खर्च करा आणि संपूर्ण निधी खर्च झाला पाहिजे, अशा सूचना दिल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:

– नागपुरातील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता वसतिगृहाची आणि उर्वरित कामे करणार. मेयोसाठी सुद्धा बराच निधी दिला. त्याचीही उर्वरित कामे करणार

– ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद वगळता अन्य तरतूद नाही, त्यामुळे नवीन लेखाशीर्ष तयार करुन ग्रामीण रस्त्यांसाठी निधी देण्यात येईल. ही कामे करताना गुणवत्ता चांगली असली पाहिजे, अशी विशेष सूचना केली आहे.

– झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे : 43,000 धारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार, त्यामुळे त्यांना कर्जही मिळेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळू शकतील.

– हद्दवाढीच्या प्रस्तावांचा विचार करताना ग्रामपंचायतींमध्ये कचर्‍याचा निचरा करण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन इत्यादींबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

– आधीच्या सरकारकडून घाईघाईने मंजूर केलेल्या कामांना पूर्वी स्थगिती दिली होती, ती 15 दिवसांपूर्वीच मागे घेण्यात आली आहे. आता पालकमंत्र्यांकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

– मेट्रोरिजनमध्ये गुंठेवारीचा निर्णय करतो आहे. न्यायालयांच्या आदेशाचे पालन करीतच हा निर्णय होईल. मात्र, त्याला निश्चित कालमर्यादा असेल.

– दीक्षाभूमी विकास : 100 कोटी देणार अशी घोषणा केली होती. 40 कोटी अ‍ॅडव्हान्स दिले होते. पण, गेल्या अडीच वर्षांत गेल्या सरकारने एक रुपया खर्च केला नाही. आता नव्याने आराखडा आला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेणार.

– समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. काही छोटी-छोटी काम प्रलंबित असल्याने आम्ही अजून तारखेवर आग्रह केलेला नाही. ती होताच तारीख घेण्यात येईल.

Back to top button
error: Content is protected !!