महाराष्ट्र
Trending

रेडी रेकोनर रेट प्रमाणे वाहन पार्किंगचे शुल्क ! कॅनॉट गार्डन क्षेत्र, निराला बाजार, पुंडलिक नगर, उस्मानपुरा, टीव्ही सेंटर, अदालत रोड, सुत गिरणी या सात ठिकाणांची निश्चिती !!

औरंगाबाद शहरात मनपाकडून 7 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर पे अँड पार्क

Story Highlights
  • पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर समिती तयार होणार, पार्किंग साठी उपलब्ध जागांची यादी तयार करा:आयुक्त, 2 महिन्याचे विनाशुल्क ट्रायल नंतर पे अँड पार्क सुरू करण्यात येईल

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात लवकरच पार्किंग धोरण अंतिम करून मंजूर केले जाणार आहे तथा प्रायोगिक तत्त्वावर शहरात 7 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ ची सोय सुरू करण्यात येणार आहे. पार्किंग धोरणाबद्दल बुधवारी सायंकाळी स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली ह्यामध्ये पार्किंग पॉलिसी बद्दल सखोल चर्चा झाली.

मोटार वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात दैनंदिन पार्किंगची समस्या तीव्र होताना दिसत आहे. भरपूर ठिकाणी वाहनधारक फूटपाथवर किंवा रस्त्यावर सुद्धा वाहने उभी करतात. पार्किंगची शिस्त नसल्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होतांना दिसते. तसेच पायी चालण्यासाठी शहराचे रस्ते असुरक्षित व त्रासदायक झाले आहे. नवीन तयार झालेल्या रस्त्यांवर पार्किंग होत असल्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. सोबतच प्रदूषण चे प्रमाण सुद्धा वाढले आहे. वाहन संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे येणाऱ्या काळात शहरात पार्किंगचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

याच कारणामुळे केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाहतूक तज्ञांच्या मदतीने शहरासाठी पार्किंग पॉलिसीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ह्यामध्ये रस्त्यावर होणाऱ्या पार्किंग वर शिस्त लावण्यासाठी ‘पे अँड पार्क’ ची सोय करून देण्यात येणार आहे.

मनपा प्रशासक व आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चोधरी ह्यांचा अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत उपायुक्त अपर्णा थेटे, मालमत्ता विभाग चे शेख मोईन, स्मार्ट सिटी चे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर आणि माध्यम विश्लेषक अर्पिता शरद व पे अँड पार्क साठी नियुक्त एजन्सी चे प्रतिनिधी स्नेहल सलगरकर उपस्थित होते.

पार्किंग पॉलिसी तयार करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे मुंबईतील वाहतूक तज्ञ तृप्ती अमृत्वार व अशोक दातार ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच स्थानिक संस्था अर्बन रिसर्च फाउंडेशन ह्यांना डाटा संकलन साठी नियुक्त करण्यात आले होते.

प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग पॉलिसी 7 ठिकाणी राबवली जाणार आहे. यामध्ये कॅनॉट गार्डन क्षेत्र, निराला बाजार, पुंडलिक नगर, उस्मानपुरा, टी व्ही सेंटर, अदालत रोड व सुत गिरणी ह्या भागांचा समावेश आहे. धोरणात प्रत्येक भागाचे जमिनीचे रेडी रेकोनर रेट प्रमाणे वाहन पार्किंग चे शुल्क ठरवण्यात आले आहे.

आयुक्त डॉ अभिजित चौधरी ह्यांनी निर्देश दिले की तासानुसर आकारण्यात जाणाऱ्या प्रस्तावित पार्किंग शुल्क चे चार्ट तयार करावे. ह्यासाठी मनपाद्वारे तंत्रज्ञांच्या मदतीने पार्किंग सिस्टीम राबवण्यासाठी ‘कर्बलेट’ ह्या एजन्सी सोबत करार करण्यात आले आहे. ह्या एजन्सी कडून ॲपच्या माध्यमाने पे अँड पार्क सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ह्याचे ट्रायल मागच्या दोन महिन्यात कन्नड गार्डन क्षेत्रात विनाशुल्क तत्त्वावर घेण्यात आले आहे.

बैठकीत असे ठरले की शहरात सगळीकडे व बाजारपेठच्या जवळ उपलब्ध खुल्या जागांचे निरीक्षण करून जिथे जिथे मनपाचे पार्किंग लॉट तयार करता येतील ह्याची यादी तयार करून अधिकाऱ्यांसोबत आयुक्त स्वतः त्या साइटची भेंट देणार आहे. मनपाकडून संचालित सर्व पार्किंग लॉट साठी निविदेची मुदत वाढविण्यात यावे. शहर पातळीवर मनपा आयुक्त ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे ज्याच्यात मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख, वाहतूक पोलीसचे अधिकारी व अन्य संस्थानचे प्रतिनिधी असणार आहे.

यावर निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर धोरण अंतिम करून मंजूर करण्यात येणार आहे. ह्यानंतर पे अँड पार्क चे दर निश्चित करण्यात येतील.

Back to top button
error: Content is protected !!