महाराष्ट्र
Trending

न्या. नरेंद्र चपळगांवकरांच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवडीचा सार्थ अभिमान: कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

औरंगाबाद, दि.११: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेले न्या.नरेंद्र चपळगांवकर यांची अ.भा.मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाली. मराठवाडयासाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे गौरवद्गार कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काढले.

विदर्भ साहित्य संघाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे फेब्रुवारीत संपन्न होत आहे. या संमलेनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांची सर्वानुमते निवड झाली.

या निवडीबद्दल कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नरेंद्र चपळगांवकर यांचे शुभेच्छा पत्र पाठवून तसेच दुरध्वनीद्वाारे अभिनंदन केले. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतील ३३ वर्षे आपण वर्धा येथे कार्य केले. आपल्या कार्यभूमीत होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाडयाच्या सूपूत्राला प्राप्त झाला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत न्या.चपळगांकर यांनी मराठीचे शिक्षण घेतले. १९५८ ते ६० या मराठी विभागाच्या पहिल्या बॅचचे प्रा.गजमल माळी, न्या.चपळगांवकर, संध्या नवाथे हे विद्यार्थी होते. तर या दोन वर्षांत त्यांना प्रा.वा.ल.कुलकर्णी, डॉ.यु.म.पठाण, डॉ.सुधीर रसाळ यांचे मार्गदर्शन आपणास लाभले.

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्राम, पवनार या पावन भूमीत होत असलेले हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल. न्या.चपळगांकर यांचे विचार पथदर्शक ठरतील, असा विश्वासही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, डॉ.कैलास अंभुरे व डॉ.गणेश कुलकर्णी यांनी चपळगांवकर यांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन स्वागत केले. दरम्यान, या भेटीत नरेंद्र चपळगांवकर यांनी मराठी विभागातील जुन्या स्मृतिंना उजाळा दिला.

Back to top button
error: Content is protected !!