महाराष्ट्र
Trending

शिक्षकांना सेवानिवृत्ती व इतर देय लाभ सात दिवसांत देण्याचे निर्देश !

'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या दिवशी 269 अर्ज प्राप्त

मुंबई, दि. 7 : महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ सात दिवसात देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. या अभियानाचा प्रारंभ 6 ऑक्टोबरपासून झाला असून 4 नोव्हेंबर, 2022 पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे.

कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या शाळांतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक दिवस शिक्षकांना सेवानिवृत्ती व इतर देय लाभ मिळत नसल्याची तक्रार आमदार श्री. भातखळकर यांनी मांडली. मंत्री श्री. लोढा यांनी अशी प्रकरणे असल्यास दिरंगाई न करता तत्काळ निकाली काढावीत असे निर्देश दिले.

पाणी वेळेत न येणे, कमी दाबाने येणे, स्वच्छता, शौचालयासंबंधी प्रश्न, नादुरूस्त पथदिवे, झोपडपट्टी पुर्नविकास करणे अशा विविध 269 विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले. तर या तक्रारीपैकी 95 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

महापालिकेच्या मैदानावर भरणाऱ्या बचतगटांच्या बाजारांची सवलत तीन ऐवजी सहा दिवस वाढवावी अशी मागणी बचतगटांच्या महिलांकडून करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.

दरम्यान सोमवार 10 ऑक्टोबर रोजी आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड – बोरीवली पश्चिम येथे पालकमंत्री श्री. लोढा भेट देणार आहेत. नागरिकांना आपल्या तक्रारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या : https://mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या : portal.mcgm.gov.in संकेतस्थळावरही ऑनलाइन तक्रारी दाखल करता येतील.

Back to top button
error: Content is protected !!