ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे निर्देश !
मुंबई, दि. 16 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता, तो आता 15.33 पैसे केला आहे.
टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये भाडेदर होता, तो आता 40 रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.
प्रवाशांना योग्यप्रकारे भाडे आकारणी करण्याकरिता ऑटो रिक्षा व टॅक्सी मध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करुन या संबंधित कार्यालयामार्फत रिकॅलिब्रेशन तपासून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारकांसाठी रिकॅलिब्रेट केलेल्या मीटरच्या चाचणीसाठी यंत्रणा कार्यरत आहे. तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेवून इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र. ०२, विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत करण्यात येत आहे.
दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजीपर्यंत या कार्यालयात नोंदणीकृत सुमारे ८० हजार ऑटोरिक्षांपैकी केवळ २९ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. तसेच नोंदणीकृत सुमारे ८ हजार काळीपिवळी टॅक्सींपैकी केवळ १३ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करुन मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. हे प्रमाण अत्यल्प असून रिकॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरसह वाहने या कार्यालयाकडून चाचणी करीता सादर करुन तपासून घेणे आवश्यक आहे.
रिकेलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. ३० नोव्हेंबर २०२२ अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकेलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.
विहित वेळेत रिकॅलिब्रेशन करून कार्यालयामार्फत घेण्यात आलेली चाचणी उत्तीर्ण केली नसल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर वाढीव भाडेदराप्रमाणे रिकॅलिब्रेट करून घ्यावे.
रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेल्या दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेवूनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत.
तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा आणि प्रवाशांकडून योग्य भाडेदर आकारावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच दि. 1 ऑक्टोबर, 2022 नंतर आटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास त्याविषयीची तक्रार संबंधित कार्यालयाकडे घटनेच्या इतर तपशीलासह करावी. ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर हे 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी रिकॅलिब्रेट करुन कार्यालयामार्फत चाचणी करुन घ्यावी व हे केल्यानंतर प्रवाशांना योग्यप्रकारे भाडेदर आकारणी करुन उत्तम सेवा देण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट