राष्ट्रीयविदेश
Trending

35 वर्षांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक बेरोजगार, जगातील सर्वात श्रीमंत लोकही भारतात: राहुल गांधी

Story Highlights
  • प्रयत्न करूनही देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

हैदराबाद, 29 ऑक्टोबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले की, जगातील सर्वात जास्त बेरोजगार आणि श्रीमंत लोक असलेला देश असा “दुर्मिळ” गौरव भारताला लाभला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ शनिवारी तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील धरमपूर येथून पुन्हा सुरू झाली. यादरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्यास हातमाग उत्पादनांवर विणकरांकडून जो काही जीएसटी भरला जात आहे, त्याची परतफेड केली जाईल.

राहुल गांधी यांनी दावा केला, “गेल्या 35 वर्षांच्या तुलनेत आज भारतात सर्वाधिक बेरोजगार आहेत. तसेच, जगातील सर्वात श्रीमंत लोकही भारतात आहेत. ते (श्रीमंत लोक) त्यांना हवे ते करू शकतात. इथे मुख्यमंत्री (के. चंद्रशेखर राव) आणि तिकडे (पंतप्रधान नरेंद्र मोदी) मोदी त्यांना पूर्ण पाठिंबा देतात. हे राजकीय पक्ष नसून व्यापारी प्रतिष्ठान आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, मी पदयात्रेदरम्यान मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला भेटलो. तेलंगणा सरकारने त्याच्या कॉलेजच्या फीची परतफेड केली नाही म्हणून तो आता ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करत आहे.

केंद्रातील भाजप आणि राज्यातील तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) वर निशाणा साधत त्यांनी आरोप केला की, मोदी सरकारकडून जी काही जनविरोधी धोरणे राबवली जात आहेत त्याचे केसीआर समर्थन करतात.

प्रयत्न करूनही देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भाजप देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप करत गांधी म्हणाले की, त्यांचा मोर्चा कोणत्याही द्वेषाशिवाय नदीप्रमाणे स्वच्छ हेतुने काढलेला आहे.

Back to top button
error: Content is protected !!