ग्रामपंचायतींना येत्या 3 वर्षांत आणखी 2 लाख कोटींचा निधी मिळणार, त्रिसूत्रीच्या आधारे प्रत्येक सरपंच गावाचा विकास करण्यात यशस्वी होईल !
प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या आधारे विकास साधावा -केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
पुणे, दि. 24 – आतापर्यंत गावांच्या विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ३ लाख ७० हजार कोटी रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. येत्या ३ वर्षात आणखी २ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी हा निधी देण्यात आला आहे. त्यातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करायला हवीत. कार्यशाळेतून परतल्यावर या उद्दिष्टांना अनुसरून काम सुरू करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार, केंद्रीय सचिव नागेंद्रनाथ सिन्हा, सह सचिव रेखा यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, देशात अनेक चांगली माणसे गावाच्या विकासासाठी आपले योगदान देत आहेत. कार्यशाळेत प्रतिनिधींनी अशा कामातून प्रेरणा घेऊन गावात बदल घडवून आणावे. ग्रामसभेचा उपयोग विकासाचे चांगले नियोजन करण्यासाठी व्हावा. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून गावाच्या विकासात योगदान द्यावे. प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर काम करून आपल्याला कोणतेही उद्दीष्ट गाठता येईल आणि देशातील प्रत्येक सरपंच गावाचा विकास करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाश्वत विकासाचा विचार करताना पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विकासाची उद्दिष्टे गाठल्याने इतरही गावांना प्रेरणा मिळेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती करून घ्यावी. शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी सातत्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी त्याबाबत सरपंचांना मार्गदर्शन करावे. आपल्या कार्याचा गावाला कसा लाभ होईल या विचाराने सरपंचांनी गावाला विकासाकडे न्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशातील २८ राज्यातून १ हजार २०० ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधीनी यात सहभाग घेतला. शाश्वत विकासाच्या ९ उद्दीष्टावर कार्यशाळेत पाच सत्रात चर्चा करण्यात आली. स्वच्छ व हरित ग्रामपंचायत, स्वच्छ आणि शुद्ध पेयजल, जलसमृद्ध गाव आदी विषयांच्या चर्चेत प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला पंचायत राज विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अधिकारी, देशभरातून आलेले सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट