महाराष्ट्र
Trending

चिंचोली लिंबाजी करंजखेड रस्त्याचे काम ठप्प, फुपाट्याने शेतकऱ्यांचं पांढरं सोनं काळवंडलं !!

रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी, शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर रस्त्याच्या धुळीचा वेढा

सचिन गुरव, चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड)

चिंचोली लिंबाजी करंजखेड रस्त्याचे काम ठप्प असल्याने वाहनधारकांतून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच याचा दुहेरी फटका शेतकर्यांना बसत आहे. रस्त्यावरील फुपाटा (पांढरी धूळ) कपाशीवर जात असल्याने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं अन् वाढवलेलं हे पांढरं सोनं काळवंडलं आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला हा प्रसासनाच्या उदासीन धोरणामुळे हातचा जात आहे.

कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी करंजखेड या 13 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला मोठ्या मुश्कीलीने मुहूर्त सापडला. तीन महिन्यांपूर्वी पुढार्यांनी मोठ्या थाटा-माटात याचे भूमीपूजन केले. मंत्री संदिपान भुमरे, विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. रस्त्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. या रस्त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीस आले होते. अनेकांना कमरेचा त्रासही सुरु झाला. यामुळे रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. हे खड्डे बुजवण्यात आले.

दरम्यान, पावसाळ्यानंतर या खड्ड्यातील फुपाटा आता नकोसा झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनांमुळे हा फुपाटा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेत पिकांवर जात असल्याने मोठे नुकसान होत आहे. याशिवाय या फुपाट्यामुळे वाहनधारकांच्या डोळ्यांना इजा होत असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

रस्त्याचे काम त्वरित करा, अन्यथा आंदोलन करू – शेतकरी राजू पवार

प्रगतिशील शेतकरी राजू पवार यांनी सांगितले की, माझ्या पाच एकर शेतीमधील सरकीचे पीक म्हणजे कपाशी पूर्णपणे मातीमोल झाले आहे. तुरीच्या शेतात सुद्धा हाच प्रकार झाला आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी राजू पवार यांनी दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!