महाराष्ट्र
Trending

वीजचोरी विरोधात 483 आकोडे बहाद्दरांना महावितरणचा झटका ! वीज कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करणार !!

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरणची महामोहीम

नांदेड दि.११ सप्टेंबर: अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात राबविलेल्या महामोहीमेत नांदेड शहर विभागाने तब्बल ४८३ वीजचोऱ्या पकडल्या आहेत. या वीजचोऱ्यांमुळे महावितरणचे दहा लाखांच्या वर नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. या वीजचोरांवर विजकायदा २००३ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणच्या सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव यांनी धडक मोहीम हाती घेतली असून जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.

दोन दिवसात राबविलेल्या धडक कारवाईत चौफाळा वीजवाहिनीवरील १२३ आकोडे, विवेक नगर वीजवाहिनीवरील परिसरात १४१ आकोडे, बिलाल नगर वीजवाहिनीवरील भागात केलेल्या कारवाईत ११२ आकोडे, तसेच देगलूर नाका वीजवाहिनीवरील लक्ष्मीनगर भागातील ३५ आकोडे,रेल्वे ट्रॅक वीजवाहीनीवरील इस्लामपुरा भागात २२ आकोडे, चौक युनीट अंतर्गत येणाऱ्या सिराज गल्लीत१० आकोडे तर चौफाळा युनीट कार्यालया अंतर्गत येणाऱ्या मॅफको वीजवाहिनीवरील ४० आकोडे टाकून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता श्री जनार्दन चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री महेश औरादे, प्रमोद क्षीरसागर,श्रीमती पिलंगवाड यांच्या नेतृत्वात देगलूर नाका, सुनील नगर, बळीरामपूर, अदनान गार्डन, मील्लत नगर, लक्ष्मीनगर, सिराज गल्ली, इस्लामपूरा, तेहरा नगर, रावत नगर, सरस्वती नगर परिसरात वीजचोरी विरोधात आक्रमक कारवाई करण्यात आली. सोबतच मीटरमधे छेडछाड करून ३२ वीजचोरांनी चोरून वीज वापरली असल्याचे उघड झाले आहे.

या कारवाईत १० लाख रूपयांच्यावर वीजचोरी झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. वीजचोरांवर वीजकायदा २००३ नुसार कलम १३५, १३६ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वीजचोरी व दंडाची एकत्रीत रक्कम वीजचोरांनी न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महावितरणने दिला आहे.

वीजचोरी करणे हा दंडात्मक गुन्हा असून एकूणच समाजाच्या, देशाच्या विकासातील मोठा अडथळा आहे. महावितरण मागेल त्याला वीजपुरवठा देण्यास बांधील असून नागरिकांनी अधीकृतरित्याच वीज वापरावी. आकोडे टाकून चोरून वीज वापरल्याने प्रसंगी अपघात होऊन जीवीतहानी होवू शकते.

वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने वीजचोरी विरोधात धडक मोहीम सातत्याने यापुढेही राबविली जाणार आहे. या कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही कंपनीच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ

Back to top button
error: Content is protected !!