महाराष्ट्र
Trending

वैजापूर: भाऊसाहेब ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ! माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी सोहळ्याकडे फिरवली पाठ !!

Story Highlights
  • मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. उल्लेखणीय आहे की, मोदी लाटेतही सतीश चव्हाण यांनी पदवीधरचा गड कायम राखल्याने पवारांचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यामुळे चव्हाण यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहे.

मुंबई, दि. 15 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्यातील भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांनी सोहळ्याला पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधल्याने वैजापूरमध्ये पक्षाची ताकद वाढणार असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना विश्वासात न घेता ठोंबरेचा प्रवेश झाला असल्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीला प्लस-मायनसचे हे राजकारण वैजापूरला पुन्हा आमदार मिळवून देणार का, या प्रश्नाचे उत्तर हे येणारा काळच ठरवेल.

वैजापूरमध्ये आता राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले आहे. मुळात हा पक्ष प्रवेश सोहळा मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे दोनाचे चार होण्याच्या हेतुने झाला खरा मात्र, या पक्ष प्रवेश सोहळ्याने दुसरा गट नाराज झाल्याचे राजकीय वर्तूळात चर्चीले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक आगामी काळात आमने-सामने येऊ शकतात, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

वैजापूरमध्ये अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली असून सध्या दोन नंबरवर पक्षाची ताकद आहे. अनेक स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. दरम्यान, ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे दोन गटांतील राजकारण तापणार की बेरजेचे राजकारण होणार, हे येणार्या काळात स्पष्ट होईल.

यांचा झाला प्रवेश- यावेळी पंकज ठोंबरे, विनायकराव गाडे, सत्यजित सोमवंशी, ऐराज शेख, अमृत शिंदे, भगतसिंह राजपूत, निलेश डाहके, नितीन थोरात, संदीप मोटे आदींसह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सहभागी झालेल्या सर्व नवीन सदस्यांचे स्वागत केले व पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजितदादा पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या पक्ष प्रवेशामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे व कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहाल, अशा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार तथा औरंगाबाद निरीक्षक अमरसिंह पंडित, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!