महाराष्ट्र
Trending

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव, शंभर कोटी वसुली प्रकरणात 11 नोव्हेंबरला सुनावणी !

Story Highlights
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तुरुंगात आहे. सीबीआयने त्यांना या वर्षी एप्रिलमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती.

मुंबई, 26 ऑक्टोबर – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर प्रकरणात जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख (७३) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी बुधवारी न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या सुट्टीतील खंडपीठासमोर जामीन अर्जाचा उल्लेख केला आणि तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.

न्यायालयाने सीबीआयला या अर्जावर ९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तुरुंगात आहे. सीबीआयने त्यांना या वर्षी एप्रिलमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती.

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला जामीन मंजूर केला होता.

विशेष सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळताना त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सांगितले होते.

देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, ते विविध आजारांनी त्रस्त असून जवळपास एक वर्षापासून तुरुंगात आहेत. या खटल्याची सुनावणी नजीकच्या काळात सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.

Back to top button
error: Content is protected !!