आदर्श नागरी पतसंस्थेच्या २०० कोटींच्या घोटाळ्यावर खा. इम्तियाज जलील पुन्हा आक्रमक ! फरार आरोपींना आणि त्यांना सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश द्या !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १६ – आदर्श नागरी पतसंस्थेच्या २०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आक्रमक झाले आह. फरार आरोपींना आणि त्यांना सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याशिवाय यापूर्वी छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्याच्या विकासासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणेचे काय झाले याचा सविस्तर अहवालही सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, अशी मागणीही खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृध्द, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांचे संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळयातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वागिण विकास होणेस्तव सर्वसामान्य जनतेची गरज व प्राथमिकतेला प्राधान्य देवून जनमत आधारे योग्य ते निर्णय घ्यावे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पत्र्याच्या (टिनशेडच्या) वर्गखोल्यांचे पक्के बांधकाम, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी आणि वक्फ मंडळाच्या विकासासाठी विशेष पॅकेजची घोषणा करणे, आमखास येथे सुसज्ज भव्य स्टेडिअम बांधकाम करणे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्था स्थापन करणे, आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांना न्याय देणे तसेच शेतकरी बांधव, गोरगरीब रुग्ण व खेळाडूंच्या हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी केली आहे.
राजधानी, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, औद्योगिक केंद्र, शैक्षणिक ज्ञानकेंद्र, जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळे व तिर्थस्थळे असलेले शेकडो वर्षे जुनी परंपरा आणि सर्वसामान्य नागरीकांच्या भावना जुळलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात आपले व कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आलेले सर्व मंत्रीमंडळाचे हार्दिक स्वागत ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होणेस्तव सर्वसामान्य जनतेची गरज व प्राथमिकतेला प्राधान्य देऊन खासदार इम्तियाज जलील यांनी मुद्देनिहाय प्रस्ताव / बाबींवर प्रकाश टाकला असून या मागण्या मान्य करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
1. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या एकूण 3335 वर्गखोल्या आजपण पत्र्याच्या (मिशेडच्या ) असुन याव्यतिरिक्त विविध शाळेतील शेकडो वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच वर्गखोल्यांत बसुन गोरगरीब, होतकरु विद्यार्थी शिक्षण घेत आहे ही बाब संपूर्ण मराठवाड्यासाठी लाजिरवाणी, अशोभणीय व चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पत्र्याच्या (मिशेडच्या) वर्गखोल्यांचे व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पक्के बांधकाम करणेस्तव 500 कोटींचे विशेष पॅकेज देण्यात यावे.
2. गंगापूर तालुक्यातील अंबळनेर येथील दहा वर्षीय मुलगा आणि वैजापूर तालुक्यातील घोडेगाव येथील महाविद्यालयीन तरुणाला चिखलमय व खराब रस्त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने दोन्ही जणांना वेळेवर प्राथमिक उपचार सुध्दा न मिळाल्याने दोघांना आपले जीव गमवावा लागला. आता अजुन किती जणांना चिखलमय व खराब रस्त्यांमुळे आपला जीव गमवावा लागेल ? तसेच शेतकरी बांधवांना मालाची वाहतुक करण्यासाठी अनेक समस्या उद्भवत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी त्वरीत विशेष पॅकेज देण्यात यावे.
3. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास अद्यावत करण्यासाठी तसेच वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि प्रलंबित प्रस्तावित कामे व प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी विशेष पॅकेज घोषणा करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रात केंद्र व राज्य शासनाच्यावतीने होणारे विविध विकासात्मक प्रस्ताव व कामात संपादित झालेल्या वक्फ मालमत्तेचा जिल्हा प्रशासनस्तरावर अडकलेला कोट्यावधींचा मोबदला वक्फ मंडळास देण्याचे आदेश संबंधितास द्यावे.
4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचा सर्वागिण विकास होण्यासाठी, मूलभूत व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच समस्त विद्यार्थ्यांना व संशोधकांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता विशेष पॅकेज देण्यात यावे.
5. आमखास मैदानावर क्रिकेट, फुटबॉल व इतर खेळाचे खेळाडू अनेक वर्षापासून सराव करत आहे. सैन्यदल, पोलीस विभाग व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी बजावणारे सर्व जवान, अधिकारी व नामवंत खेळाडू यांनी सुध्दा आमखास मैदानावरच सराव केलेला आहे. गोरगरीब, होतकरु व गुणवंत खेळाडुंचा भवितव्याचा विचार करुन आमखास मैदानावर अद्यावत भव्य स्टेडियम बांधकामाची घोषणा करुन काम सुरु करण्यात यावे.
6. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक वेळी वाहतुकीची समस्या उद्भवून अनेक अपघात होतात त्यामध्ये कित्येक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. नाशिक धर्तीवर ज्याप्रमाणे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी फ्लायओव्हरची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अहमदनगर नाका ते चिकलठाणा मार्गावर अखंड उड्डाणपूल बनविण्यात यावे जेणे करुन वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही.
7. इतर मोठ्या शहरामध्ये पॉलिटिक्न रिजनल डेव्हलेपमेंट अथॉरित विशेष आ.ए.एस. अधिकारीची नियुक्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर करीता सुध्दा एक आ.ए.एस. अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी.
8. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाण्याची समस्या खुप गंभीर आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाण्याची योजना सुध्दा तयार करण्यात आलेली आहे. योजनेचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश निर्गमित करावे.
9. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील गोरगरीब लाभार्थी सात वर्षांपासून घरे मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे, घरकुल योजनेचे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश देण्यात यावे.
10. मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी नुकसान भरपाई याव्यतिरिक्त पेरणीसाठी, खते व बियाणासाठी व इतर साधनसामुग्री करिता विशेष पॅकेज देण्यात यावे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वन्यजीवांपासून शेतकरी बांधवांचे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी योग्य ते उपाययोजना राबविण्यात यावे तसेच शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न, समस्या ह्या शासनस्तरावर प्रलंबितच आहेत त्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे.
11. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या, छत्रपती संभाजीनगर महानरगपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महावितरण, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालय व आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना शासन निर्णय, परिपत्रक व कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन, पी. एफ., ई.एस.आय.सी व इतर योजनांचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित करुन गोरगरीब कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणुक व कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व संबंधितांविरुध्द योग्य ती कार्यवाही करावी.
12. गावातील प्रत्येक कुंबियांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेची सुरुवात केली असुन अनेक गावांत आजपर्यंत कामे सुरुच झाली नाही, बहुतेक गावांत कामे अर्धवट सोडलेले आहे. सदरील योजनेची विहित मुदतीत प्रभावीपणे अमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमित करावे.
13. आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृध्द, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांचे संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळयातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे.
14. महाराष्ट्रातील सहकारी बँका व पतसंस्थांमधील गोगरीब ठेवीदारांचा प्रत्येक रुपया सुरक्षित आहे; आणि जर ते बुडाले तर सरकार 6 महिण्यांच्या आत व्याजासह मुद्दल परत करेल ही घोषणा करण्यात यावी, आदी मागण्या खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केल्या आहेत.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट