महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश !

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिले.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशमुख यांचा जामीन अर्ज 21 मार्चपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

न्यायालय म्हणाले, “जामिनासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्याचा अर्ज लवकरात लवकर निकाली काढला जाण्याची अपेक्षा असते. जामीन अर्ज प्रलंबित असणे हे कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही.”

न्यायालय म्हणाले, “आम्ही निर्देश जारी करतो आणि याचिकाकर्त्याला हे प्रकरण ज्यांच्याकडे (सुनावणीसाठी) सोपवण्यात आले आहे त्या विद्वान न्यायाधीशांसमोर उद्या अर्ज करण्याची परवानगी देतो. या अर्जावर याच आठवड्यात सुनावणी होऊन त्यावर लवकर निर्णय घेण्यात यावा.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की त्यांनी या प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही मत दिलेले नाही.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.जे जमादार देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!