महाराष्ट्र
Trending

जायकवाडी पक्षी अभयारण्य व पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन, पुनरुज्जीवन होणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कातपूर येथे अरण्यम पद्धतीने वृक्ष लागवड

औरंगाबाद, दिनांक 26 : जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसर व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन, पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

पैठणच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत अरण्यम पद्धतीने कातपूर येथे वृक्ष लागवड प्रकल्पाचे उदघाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून झाले.

या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य वन संरक्षक सत्यजित गुजर, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, विभागीय वनाधिकारी किर्ती जमदाडे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाले, एन. व्ही. पाखरे, पैठण वन परिक्षेत्र अधिकारी गंगाधर सातपुते, औरंगाबादचे अनिल पाटील, सोयगावच्या नीता फुले, तांत्रिक सल्लागार मेघना बडजाते, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, अरण्यम प्रकल्प दिशादर्शक ठरावा, असे 300 प्रकारच्या वृक्ष प्रजाती लावण्यात येत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांची पैठण ही पावन भूमी आहे. येथे भाविक बहुसंख्येने या ठिकाणी येतात. पर्यटक, पक्षी प्रेमीही येतात. अरण्यम प्रकल्प पर्यटन स्थळ, दुर्मिळ वृक्ष जातींचे परिचय केंद्र तथा संग्रहालय म्हणून विकसित होईल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र अभ्यासकांना तांत्रिक अभ्यास, संशोधनासाठी संदर्भीय स्थळ म्हणून उपयोगी ठरेल. घन-वन वृक्ष लागवडीने मानवासह पशु, पक्षी, कीटक यांसाठी हा हरित भवितव्य निर्माण होऊन जैवविविधता संवर्धन होईल.

पक्ष्यांच्या अधिवासाने, येण्या जाण्याने विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लागवड होतील, असेही चव्हाण म्हणाले. तदनंतर त्यांच्या हस्ते अरण्यम घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमती जमदाडे यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये रमले जिल्हाधिकारी
पैठणच्या श्री नाथ विद्यालयाच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कार्यक्रमास होती. मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हाधिकारी चव्हाण रमून गेले. त्यांच्याशी चव्हाण यांनी मनमोकळा संवाद साधला.

यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात करिअर करा. गुरुजनांचा, पालकांचा आणि मित्रांचा आदर राखा. तुम्ही जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंदर्भातील शंकांचे निरसन श्री. चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन श्री. चव्हाण यांचे आभार मानले.

Back to top button
error: Content is protected !!