आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया या प्रवृत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होवू शकते, ‘शॉर्टकट’ वृत्तीने देश चालू शकत नाही: प्रधानमंत्री मोदी
स्थायी विकासाच्या धोरणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण - भूमिपूजन
- पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच वंचितांच्या विकासास अग्रक्रम- प्रधानमंत्री
नागपूर, दि. 12 : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन, नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण, नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभ, नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन, सेंटर फॉर स्किलींग ॲड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण असे विविध कार्यक्रम आज पार पडले.
नागपूर येथे आज ज्या विविध योजनांचे लोकार्पण झाले त्यातून सरकारचा विकासाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. एम्स, समृद्धी महामार्ग, वंदे भारत गाडी, मेट्रो हे सारे विविध प्रकल्प विविध क्षेत्रातील जनतेच्या हिताचे आहेत. जीवनाच्या विविध अंगांना आम्ही त्यातून स्पर्श करीत आहोत असे सांगून श्री. मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
विविध धर्मक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. एम्स संस्थेच्या उभारणीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. या साऱ्यांच्या माध्यमातून मानवी संवेदना जोपासल्या गेल्या आहेत. जेव्हा अशा सुविधा देताना मानवी चेहरा नसतो तेव्हा त्याचा जनतेला मोठा फटका बसतो असे सांगताना त्यांनी गेली ३०-३५ वर्ष रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले.
विकासाला जेव्हा मर्यादित ठेवले जाते तेव्हा निर्माण होणाऱ्या संधीही मर्यादित असतात असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, यापूर्वी शिक्षण मर्यादित होते तेव्हा येथील गुणवत्ताही पूर्ण क्षमतेने समोर आली नाही. यामुळे मोठा वर्ग विकासापासून वंचित राहिला, त्याचा परिणाम म्हणून देशाची खरी ताकद पुढे आली नाही. मात्र, गेल्या आठ वर्षात आम्ही दृष्टीकोन आणि विचारपद्धतीत बदल घडविला. ‘सबका साथ, सबका विकास‘ या सूत्राच्या सार्थकतेसाठी ‘सबका प्रयास’ही गरजेचा आहे. त्यात देशातील प्रत्येक नागरिक सहभागी झाला तरच देश विकसित होवू शकेल.
आजवर जे वंचित-उपेक्षित राहिले ते आता आमच्या प्राधान्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत, हे स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी ‘वंचित को वरियता‘ हे या सरकारचे सूत्र असल्याचे आग्रहाने सांगितले. शेतकरी, पशुपालक, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध वर्गांचा विचार करून योजना राबविल्या जात आहेत. देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न होत आहे. हे जिल्हे प्रामुख्याने आदिवासीबहुल आहेत. गेल्या आठ वर्षात आम्ही विविध वंचित क्षेत्रांना विकासाचे केंद्रे बनवित आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटण्याचा शॉर्टकट अवलंबणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर टीका करून प्रधानमंत्री म्हणाले, केंद्र सरकार पुढील २५ वर्षांचे उद्दिष्ट्य आखून काम करीत आहे. मात्र, काही प्रवृत्ती देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर आपण आहोत अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, ‘शॉर्टकट‘ वृत्तीने देश चालू शकत नाही. दूरगामी दृष्टीकोन असल्याशिवाय देशाचा स्थायी विकास होवू शकत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले.
यापूर्वी प्रामाणिक करदात्यांनी दिलेला पैसा चुकीच्या आणि अनिष्ट बाबींसाठी खर्ची पडला आता हा पैसा युवा पिढीच्या भविष्यासाठी खर्च झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया ‘ या प्रवृत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होवू शकते अशा प्रवृत्ती पासून देश वाचवला पाहिजे ‘शॉर्टकट’ ऐवजी स्थायी विकासाचे धोरणच आपली मोठी गरज आहे. देशहितासाठी सर्वांनी त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट