राष्ट्रीय
Trending

सात ते आठ आमदार संपर्कात !आमदार राणांनी माफी मागावी, अन्यथा मोठे पाऊल उचलणार: आमदार बच्चू कडूंचा इशारा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्यासाठी कडू यांनी पैसे घेतल्याचा राणांचा आरोप

Story Highlights
  • बच्चू कडू असेही म्हणाले, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना पैसे दिले की नाही हे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगावे.

मुंबई, 30 ऑक्टोबर – प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांना माफी मागण्यास सांगितले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्यासाठी कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता.

रवि राणा आणि बच्चू कडू यांनी शिंदे-भाजप सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडे हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. राणा रविवारी मुंबईत पोहोचले आणि बच्चू कडू रविवारी रात्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी होऊन तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार कोसळले. बच्चू कडू त्या सरकारमध्ये मंत्री होते.

एकनाथ शिंदे यांनी नंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पाठिंब्याने सरकार स्थापन केले.

रवि राणा आणि बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अनुक्रमे बडनेरा आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा देत आहेत.

रवि राणा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावे किंवा माफी मागावी आणि आपल्यावरील आरोप मागे घ्यावेत, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

बच्चू कडू असेही म्हणाले, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना पैसे दिले की नाही हे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगावे.

रवि राणा रविवारी अमरावतीहून मुंबईत पोहोचले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “शिंदे आणि फडणवीस हे माझे नेते आहेत आणि मला मुंबईला बोलावले आहे म्हणून मी आलो आहे.”

बच्चू कडू हेही मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. राणाच्या आरोपांमुळे आपली बदनामी झाली असून या समस्येचे समाधानकारक निराकरण न झाल्यास आपल्याला मोठे पाऊल उचलावे लागेल, असे ते अमरावतीत म्हणाले.

सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला. मात्र, त्याबाबत त्यांनी सविस्तर खुलासा केला नाही.

288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. शिंदे यांना शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार तसेच काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपचे सभागृहात 106 आमदार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!