महाराष्ट्र
Trending

वैजापूर पंचायत समिती सदस्यास लोखंडी गज व बेल्टने मारहाण ! मोटारसायकल हळू चालवण्यावरून वाद पेटला !!

औरंगाबाद, दि. २९ – कच्च्या रस्त्यावरील वळणावर मुले खेळतात त्यामुळे येथे मोटारसायकल हळू चालवत जा, असा सल्ला देणे पंचायत समिती सदस्यास महागात पडले. तू तुझी मोटार सायकल हळू चालवत जा मला नको शिकवू, असे म्हणून मुलाने व बापाने पंचायत समिती सदस्यास लोखंडी गज व बेल्टने मारहाण केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी पंचायत समिती सदस्यांने पोलिसांत धाव घेतली असून संबंधीतांवर गुन्हे दाखल केले आहेत. मारहाण करणारे हे पंचायत समिती सदस्यांचे शेजारी आहेत.

सोन्या सुरेश साळवे व सुरेश पुंजा साळवे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

रविंद्र मुरलीधर कसबे (वय 40 वर्षे व्यवसाय शेती व पंचायत समिती सदस्य वैजापूर, रा घायगांव ता वैजापूर जि. औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते पंचायत समिती वैजापूर येथे सन 2016 पासून पंचायत समीती सदस्य आहेत. त्यांच्या घराशेजारी सुरेश पुंजा साळवे हे त्यांच्या परिवारासह राहतात.

आज दिनांक 29/11/2022 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे घरून घायगांव (ता वैजापूर) येथे राशन आणण्यासाठी मोटार सायकलने जात होते. घरासमोरील कच्चा रस्त्याने मोटार सायकलने जात असताना रस्त्याच्या वळणावर समोरून त्यांचे शेजारी सुरेश पुंजा साळवे यांचा मुलगा सोन्या सुरेश साळवे हा त्याच्या मोटार सायकलवर जोरात गाडी घेवुन आला.

तेव्हा पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांनी त्यांची मोटारसायकल थांबवून त्यास आवाज देवून म्हणाले की, वळणाचा रस्ता आहे येथे लहान मुले खेळतात तू मोटारसायकल हळू चालवत जा. असे त्यास म्हणाले असता, सोन्या सुरेश साळवे हा पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांना शिवीगाळ करत म्हणाला की रस्ता तुझ्या बापाचा आहे का, तू तुझी मोटार सायकल हळू चालवत जा मला नको शिकवू असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यानंतर सोन्याने त्यांना चापट बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेव्हा तेथे त्याचे वडील सुरेश पुंजा साळवे हे त्यांच्या हातात लोखंडी गज घेवून आले व त्यांनीही पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांना शिवगाळ करत त्यांच्या हातातील लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडले. त्यानंतर सोन्या सुरेश साळवे यानेही त्याच्या कमरेचा बेल्ट काढून बेल्टने पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांच्या पाठीवर व डाव्या हातावर मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. भांडणाचा आवाज ऐकून तेथे पंचायत समिती सदस्य रविंद्र मुरलीधर कसबे यांचा भाऊ विद्याधर मुरलीधर कजबे न घराशेजारी राहणारे आले व त्यांनी सोडवले.  याप्रकरणी रविंद्र मुरलीधर कसबे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!